ग्रामस्वच्छता अभियानात सावखेडा ग्रामपंचायतला जिल्ह्यात तिसरा क्रमांक

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) : तालुक्यातील सावखेडा बुद्रुक - खुर्द ग्रुप ग्रामपंचायतीने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात जिल्ह्यात तिसरा क्रमांक मिळवला आहे. नुकतीच या ग्रामपंचायतची जिल्हा स्तरीय पथकाने पाहणी केली होती.

या ग्रामपंचायतने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात सहभाग घेत विविध विकासकामे केली. गावात स्वच्छता, सीसीटीव्ही, शाळांचे सुशोभीकरण, अभ्यासाचा भोंगा आदी उपक्रम हाती घेत राबवले. यात अभ्यासाचा भोंगा या उपक्रमात ही ग्रामपंचायत राज्यात दुसरी तर जिल्ह्यात पहिली आलेली आहे. 

ग्रामपंचायतने वनराई बंधारे, गावात स्वच्छता, शाळांचे सुशोभीकरण, मुख्य ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, रोजगार निर्मिती, महिला बचत गट सक्षमीकरण आदी उपक्रम राबविले. या कामांची पाहणी जिल्हा स्तरीय पथकाने केली होती. बिडीओ रत्नाकर पगार यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच काशिनाथ गोरे, उपसरपंच प्रभाकर गोंगे, ग्रामविकास अधिकारी विलास ढेंगे व सहकारी सदस्यांनी यासाठी परिश्रम घेतले. तर तिसरा क्रमांक मिळाल्याने जिल्हा परिषदचे मुख्यकार्यकारी अधिकारी अंकित, मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. ओमप्रकाश रामावत यांनी अभिनंदन केले आहे.

गाव करी ते राव काय करी
ग्रामीण भागात गाव करी ते राव काय करी, अशी म्हण प्रचलित आहे. त्याचा प्रत्यय या ग्रुप ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी दिला. सरपंचांनी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात भाग घेण्याची संकल्पना मांडली. याला सदस्य व ग्रामस्थांनी साथ देत गावात विविध उपक्रम राबवले. ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या या परिश्रमला यश आले व जिल्ह्यात या ग्रुप ग्रामपंचायतने तिसरा क्रमांक मिळवला. ग्रामस्थांच्या मदतीमुळे हे यश मिळवता आले, असे सरपंच काशिनाथ गोरे यांनी सांगितले.